राम जन्मला ग सखी... राम जन्मला..! ‘जय श्रीराम’च्या गजराने शहर दुमदुमले

Foto
औरंगाबाद: रामनवमीनिमित्त आज शहरातील ठिकठिकाणच्या राममंदिरांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राममंदिरात दर्शन घेण्यासाठी हजारो भक्‍तांनी रांगा लावल्या. यावेळी ‘जय श्रीराम’च्या गजराने संपूर्ण शहर दुमदुमले. सर्वाधिक प्राचीन समजले जाणारे शहरातील किराडपुरा येथील श्रीराम मंदिर तसेच उस्मानपुरा, पद्मपुरा, जवाहर कॉलनीतील टिळकनगर परिसरातील राम मंदिरातही भक्‍तांनी आज पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्‍तीमय झाला.

असंख्य भक्‍तांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता महाआरती क़रून श्रीरामप्रभूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. भक्‍तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कीर्तन ऐकले. यावेळी  किराडपुरा राममंदिराचे अध्यक्ष मानसिंह पवार, उपाध्यक्ष कन्हैय्यालाल सिद्ध, दयाराम बसैय्ये, विजय शिंदे, भास्करराव बेलसरे, आ. अतुल सावे, हेमंत जोशी, जगन्‍नाथ गुळवे, उत्तमराव मनसुटे, अवधूत जगताप, उल्हास गवळी, अ‍ॅड. भूषण पटेल, चंद्रशेखर राजूरकर, सुधीर विध्वंस आदींनी सहकार्य केले. आज सायंकाळी पाच वाजता किराडपुरा येथील राम मंदिर ट्रस्टच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये रथ, ढोल, ताशे, बॅण्ड पथकाबरोबर भजनी मंडळी सहभाग नोंदविणार आहे. ही शोभायात्रा किराडपुरा राममंदिर ते आझाद चौक, आविष्कार कॉलनी, बजरंग चौकमार्गे  पुन्हा किराडपुरा राम मंदिरात आल्यानंतर तेेथे समारोप करण्यात येणार आहे. रामनवमीनिमित्त रक्‍तदान शिबिरात अनेकांनी रक्‍तदान करून सामाजिक बांधिलकी  जपली.